
बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मानसोपचारतज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई या विषयतज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवीनी फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. सविता देगिनाळ होत्या. तर वडगाव येथील मंगाई भजनी मंडळाच्या नीताताई चंदगडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कावेरी लमाणी यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ सविता देगीनाळ यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
या वेळी विषयतज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई यांनी भावनिक तग धरण्याची क्षमता आणि स्वतःची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःच्या भावनांची ओळख करून त्यांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तणाव कमी करण्यासाठी शेकिंग आणि टॅपिंगसारख्या सोप्या व्यायामांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच नियमित चालणे, व्यायाम आणि योग करणे तसेच आपले मन मोकळे करून मित्रमैत्रिणींशी भावना व्यक्त करणे यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सविता देगिनाळ यांनी सांगितले की, संजीवीनी फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च ते ८ एप्रिल हा कालावधी “महिला आरोग्य जागृती महिना” म्हणून साजरा केला जात आहे. या कालावधीत बेळगाव शहर व परिसरात विविध मार्गदर्शन शिबिरे व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षीच्या महिला आरोग्य जागृती महिन्याची सुरुवातही या कार्यक्रमाने करण्यात आली, असे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची आणि स्व-देखभालीची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी उपस्थित महिलांशी परस्परसंवाद करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी केले तर सरिता सिद्धी यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास सल्लागार डॉ. सुरेखा पोटे, शंकर पाटील तसेच मंगाई भजनी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. एकूणच या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Belgaum Varta Belgaum Varta