Friday , August 28 2026
Breaking News

शिशु वर्गातील मुले रमली रात्रनिवास शाळेत

Spread the love

 

बेळगाव : शाळेचा परिसर म्हटला की, अभ्यासाची गडबड आणि दप्तराचे ओझे डोळ्यासमोर येते. मात्र, नुकताच मराठी विद्यानिकेतन शाळेतील बालवाडीतील शिशु वर्गातील चिमुकल्यांसाठी एक अनोखा ‘रात्रनिवास’ उपक्रम राबवण्यात आला. घरातून पहिल्यांदाच आई- बाबांशिवाय रात्रभर शिक्षकताई आणि बालवाडी कर्मचारी यांच्या समवेत शाळेत मजामस्ती, खेळ, नाचगाणी, खाऊ यांचा अनुभव घेताना या लहान मुलांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
बुधवार दि. 11 मार्च रोजी संध्याकाळी 6.00 वाजता डोळ्यावर वेगवेगळ्या रंगाचे कागदी मास्क घालून मुलांचे आगमन झाले. मुलांचे आगमन झाल्यानंतर प्रार्थना आणि मजेचा खेळ खेळून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला ‘भडंग आणि उसाचा रस यावर मुलांनी ताव मारला. त्यानंतर शिक्षकांनी घेतलेल्या गाण्यांच्या मैफिलीत मुले दंग झाली. विविध खेळांमुळे संपूर्ण शाळेचा परिसर मुलांच्या किलबिलाटाने दुमदुमून गेला होता.
रात्री 9.30 वाजता सर्व मुलांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर शेकोटी पेटवण्यात आली. शेकोटीभोवती गोल फिरत ‘बेळगावचा म्हातारा शेकोटीला आला’….. या गाण्यावर मुलांनी ताल धरला. यानंतर माधुरी पाटील यांनी मुलांना ‘छोट्या गणूची गोष्ट’ सांगितली. यानंतर शिक्षकांनी सांगितलेल्या गाण्यांवर मुलांनी मस्त ताल धरुन नाच केला. यानंतर मुलांना आईस्क्रीम देण्यात आला, आईस्क्रीम मुलांसाठी विशेष आवडणारा पदार्थ ठरला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकासमवेत 25 हून अधिक पालकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. स्वयंपाक बनवण्यापासून ते सजावटीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या पालक आणि शिक्षकांनी मिळून पार पाडल्या.
शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. रेणू पवार, वरदा देसाई, सुनिता पाटील, भारती शिराळे, अश्विनी हलगेकर, नयन परमोजी, प्रतिभा, तेजश्री हंडे, श्रद्धा पावशे, नारायण गणाचारी, धीरजसिंह राजपूत, विशाल पाटील, दत्ता पाटील, वैभवी दळवी, आशा जाधव, वैभवी मोरे, किशोर पवार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावचे सीईओ राहुल शिंदे यांच्यावर सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी

Spread the love  बेळगाव : जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्यावर ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *