बैलहोंगल : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या एका दिवसात यश मिळाले आहे. घरासमोरील रस्त्याच्या वापरावरून निर्माण झालेल्या किरकोळ वादातूनच नातेवाईकाची हत्या करून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
कोप्प अगसी परिसरात राहणारे महेश बसय्या उपनिमठ यांचा १७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास खून करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी रुद्रय्या बसय्या उपनिमठ (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महेश यांच्यात काही दिवसांपासून रस्त्याच्या वापरावरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी चिकन सेंटरजवळ दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्या वेळी महेश यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने त्याचा राग मनात ठेवत नंतर संधी साधून कोयत्याने हल्ला करून त्यांचा जीव घेतला.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय शिवानंद गुडगनट्टी आणि पीएसआय एच. के. पाटील यांच्या पथकाने जलद हालचाली करत १८ मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या वेगवान कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta