
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याप्रमाणे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हे बेजबाबदार विधाने करून जातीय सलोखा बिघडवत आहेत. त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. बेळगावातील काँग्रेस भवनात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना आ. निंबाळकर म्हणाल्या, बंगळुरात चंद्रू याच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केलेले बेजबाबदार विधान निषेधार्ह आहे. जातीय सलोखा बिघडविण्यासाठी संघाचे एजंट असल्याप्रमाणे ते बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यात बेरोजगारीची समस्या आवासून उभी आहे. बेरोजगार युवकांना जातीय संघर्षात ओढून, हिंदू-मुस्लिम असा जाती-धर्मात भेद करून भांडणे लावत आहेत. यातून ते व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मी विनंती करते, त्यांनी जातीय सलोखा बिघडविणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदीचा वापर वाढवण्यासंदर्भात केलेल्या आग्रहावर आ. निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला. सगळ्या भाषा सोडून अमित शहा यांनी हिंदीचा आग्रह धरणे चुकीचे आहे. केंद्र सरकार भारताची शक्ती एकवटण्यास निघाले आहे. देशातील ६०% लोकांना हिंदी बोलता येत नाही. विविध ठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात. हीच भारताची संस्कृती आहे असे त्यांनी सांगितले. हिंदू धर्म प्राचीन धर्म आहे. तो कोणालाही संपूर्णपणे नष्ट करता येणार नाही. केवळ मतांसाठी भाजप जातीधर्माचे राजकारण करत आहे. ते काय हिंदुराष्ट्र स्थापन करणार? असा उपहास त्यांनी केला. आताही आम्ही हिंदू राष्ट्रातच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक अंगरक्षक मुस्लिमच होता, मग त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेच ना? भाजप-संघ नव्याने कसले हिंदुराष्ट्र निर्माण करायला निघाले आहेत? संघाची हिंदुराष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य नाही. आम्ही स्वतःच हिंदू आहोत, हिंदू धर्म म्हणजे केवळ हिंदू नव्हेत, ब्राह्मण, एससी-एसटी, मुस्लिम सगळे मिळूनच व्यापक अर्थाने हिंदू धर्म होतो, हे आधी तुम्ही समजून घ्या, असे आ. निंबाळकर म्हणाल्या.
पत्रकार परिषदेत काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, महानगर जिल्हाध्यक्ष राजू सेठ, सुनील हनमण्णावर, जगदीश सावंत, बसवराज शिगावी यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta