मुलांचा मेंदू ही रिकामी बाटली नसून ज्ञानाने भरलेली घागर; भारतीय महसूल अधिकारी आकाश चौगुले यांचे प्रतिपादन
बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधून राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचतात. याचाच प्रत्यय येथील मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाने आयोजित ‘मुलांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शना’तून आला. बालवाडी विभागाच्या चिमुकल्यांनी साकारलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी मुलांच्या हातात असलेल्या उपक्रमांच्या प्रतिकृतींवरील फीत सोडून प्रमुख पाहुणे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी माननीय आकाश चौगुले यांनी केले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “कोणतीही इमारत उभी करण्यापूर्वी तिचा आराखडा उत्तम असावा लागतो. या शाळेत मुलांच्या भविष्याचा आराखडा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मातृभाषेतून तयार केला जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे काळाची गरज असून, पालकांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.”
श्री. चौगुले यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीतील एका रंगांच्या मानसशास्त्रीय प्रयोगाचा दाखला दिला. रंगांच्या चौकटी आणि त्यावर लिहिलेली विसंगत नावे ओळखण्यात मोठे लोक गोंधळले, मात्र ४-५ वर्षांच्या लहान मुलीने ते सहज ओळखले. यावरून त्यांनी स्पष्ट केले की, मुलांचा विचार करण्याचा वेग आणि पद्धत आपल्यापेक्षा प्रगल्भ असते. “मुलं तुम्ही जे सांगता ते ऐकत नाहीत, तर तुम्ही जे करता ते बघून शिकतात (Children will not do what you say, they do what you see). त्यामुळे घर असो वा शाळा, मोठ्यांचे वर्तन मुलांसमोर आदर्शच असायला हवे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मुलं आणि फुलं यातील फरक सांगताना मुलांनी दिलेली उत्तर “फुले भेट देता येतात, मुले नाही” फुलं कुंडीत उगवता येतात, मुलं नाही ही उदाहरणे देऊन त्यांनी मुलांच्या अफाट निरीक्षण शक्तीचे दर्शन घडवले. “आजचे प्रदर्शन हा केवळ कृत्रिम देखावा नसून मुलांचे व्यक्त होणे आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे,” असेही त्यांनी नमूद केले.
शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी बालवाडीतील शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. “या वयात केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून आणि अनुभवातून शिक्षण देणे महत्त्वाचे असते. याच पायावर मुलांची भविष्यातील जडणघडण अवलंबून असते,” असे मार्गदर्शन त्यांनी पालकांना केले . विद्यार्थ्यांनी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण, विज्ञान आणि विविध विषयांवर आधारित प्रकल्प अतिशय कल्पकतेने मांडले होते. हे पाहण्यासाठी पालक आणि मुलांनी मोठी गर्दी केली होती. पालकांचा वेळोवेळी लाभलेला सहभाग हा या कार्यक्रमाच्या यशाचा केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी करून वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. उद्धाटनाला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, शिक्षण संयोजिका नीला आपटे व शिक्षक समन्वयक सविता पवार उपस्थित होते.
सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरदा देसाई यांनी केले. बालवाडी शिक्षिका रेणू पवार, भारती शिराळे, अश्विनी हलगेकर, वरदा देसाई, प्रतिभा धुडूम, श्रद्धा पावशे, नयन परमोजी, तेजश्री हंडे आणि सुनीता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta