Sunday , April 5 2026
Breaking News

सीमा लढ्याचे निष्ठावंत सेनापती कै. दीपक दळवी

Spread the love

 

सीमा लढ्याचा धगधगता प्रश्न सोडवण्यासाठी लढणारे एक सीमा लढ्याचे निष्ठावंत सेनापती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व अध्यक्ष दीपक दळवी यांचे मंगळवार दिनांक 17 रोजी दुःखद निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्ताने……

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न संदर्भात मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आंदोलने, कोर्टकचेरी अखंड संघर्ष करणे आणि सीमा लढा सोडविणे हे ध्येय मनी बाळगत वाटचाल करणारे आणि झटणारे नेतृत्व हरपले आणि सीमा भाग पोरका झाला. सीमा लढ्याचा बुलंद आवाज म्हणजे दळवी साहेब होते. त्यांच्या निधनाने सीमा लढ्याची हानी झाली आहे. बेळगावसह कर्नाटकातील 865 मराठी गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली असताना सीमा भागात सीमा लढा पेटलेला होता. सत्तरच्या काळात प्रत्येकाला सीमा भाग महाराष्ट्रात विलीन झाला पाहिजे असा ध्यास होता. याच काळात युवा नेते दीपक दळवी सीमा लढ्यात अधिक सक्रिय झाले. कॉलेज जीवनात त्यांनी बेळगावातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परीक्षा देता आली पाहिजे अशी मागणी करत लक्षवेधी आंदोलन केले आणि पुढे युवा नेते म्हणून सीमा लढ्यात सक्रिय झाले. रात्रीच्या वेळी सीमा लढ्याची रूपरेषा चौकातील दुकानांच्या बाहेर आखण्यात येत असे. हुतात्मा चौक “सुभाष फोटो”च्या कट्ट्यावर सीमा लढ्याच्या प्रश्नाबाबत योजना आखत त्यांचे नेतृत्व बहरत गेले. दीपक दळवी हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर मात्र हा व्यवसाय करत असताना सीमा लढ्याबाबत ते अधिक कृतिशील राहिले 1983 साली महापौर निवडणुकीबाबत सर्व नगरसेवकांचे एकमत करून बेळगावचे पहिले महापौर सुभाष जाधव यांची निवड करण्यात आली यावेळी दीपक दळवी यांची भूमिक महत्त्वपूर्ण ठरली. बेळगाव ते मुंबई पद मोर्चा आणि कोल्हापुरात दीपक दळवी यांना झालेली अटक यामुळे महाराष्ट्रात वादळ उठले आणि युवा नेतृत्व अधिक भक्कम बनले. कोल्हापुरात रास्ता रोको, बेळगाव ते पंढरपूर सायकल मोर्चा असे विविध अभिनव राबवत सीमा प्रश्न सतत झटत राहिले. 2004 साली विधानसभेच्या निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र या पराभवाला न डगमगता सीमा लढ्यासाठी ते झटत राहिले. सीमा प्रश्नाला चालना मिळावी यासाठी मुंबई, दिल्ली फेऱ्या मारत प्रयत्न करत राहिले. समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर आली आणि ते अधिक सक्रिय झाले. महामेळावे, न्यायालयीन कामकाज, सरकार, प्रशासन संघर्ष, सीमा प्रश्न, मार्गदर्शन, समितीचे नेतृत्व करत राहिले. एकीकडे सीमा प्रश्नाचा अभ्यास, मोर्चा, मेळावे तर दुसरीकडे सहकार, शिक्षण म्हणजेच मराठा बँक ओरिएंटल स्कूलची धुराही त्यांनी सांभाळली. महाराष्ट्र शिक्षण संस्थेशी देखील त्यांचा निकटचा संबंध होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत सीमा लढ्याचा अभ्यास त्यांना लागून राहिला होता. त्यांच्या जाण्याने सीमाभाग पोरका झाला आहे. सीमा लढ्याची हानी झाली आहे. मात्र या प्रश्नासाठी नव्या जोमाने लढून सीमा प्रश्न सोडवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल..

                               – पत्रकार राधिका सांबरेकर, बेळगाव

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *