

मागील 70 वर्षे चालत असलेल्या सीमा लढ्याचे ते खंबीर आधारस्तंभ होते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि तत्कालीन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव (आप्पा) पाटील यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची धुरा दीपक दळवी साहेबांनी यशस्वीरित्या सांभाळली आणि सीमा लढ्याला धीराने आणि जोमाने पुढे नेले. दीपक दळवी हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर. गोरापान उंच देखना राजबिंडा असे व्यक्तिमत्व. मनात आणले असते तर यशस्वी बिल्डर म्हणून बक्कळ पैसा कमवता आला असता. परंतु मराठी अस्मिता आणि सीमा प्रश्नी असलेली तळमळ त्यांना कधीच स्वस्त बसू दिली नाही. 1985 मध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 15 एप्रिल 1985 रोजी त्यांनी बेळगाव ते मुंबई असा ऐतिहासिक पद मोर्चा काढला आणि तो यशस्वी देखील केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी 1 मे रोजी मुंबईत या पद मोर्चाचे स्वागत केले आणि सीमा लढ्याला नवे बळ दिले. दळवी साहेबांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या पद मोर्चामुळे सीमाभागात एक नवचैतन्य निर्माण झाले आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी झाला. 1986 साली झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनात देखील दळवी साहेब अग्रभागी होते. सीमा लढ्यात ते नेहमी अग्रभागी असत. कन्नड सक्ती आंदोलनावेळी त्यांना महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत अटक देखील करण्यात आली होती. 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनात बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकात केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या अटकेनंतर आंदोलन अधिकच पेटले. या संवेदनशील काळात देखील दीपक दळवी यांनी संयम धैर्य आणि दूरदृष्टी दाखवत कार्यकर्त्यांना ठेवत आंदोलनाचे नेतृत्व केले. मुंबई असो की दिल्ली राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर सीमा प्रश्न अत्यंत सोप्या आणि चांगल्या पद्धतीने मांडून सीमा प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. 1987 साली बेळगाव ते पंढरपूर सायकल मोर्चा असो किंवा कोल्हापुरातील रस्ता रोको प्रत्येक ठिकाणी दीपक दळवी आघाडीवर असायचे.
वेळोवेळी झालेल्या आंदोलन, लढ्यांमध्ये शरद पवार यांचा सहभाग सक्रिय असायचा. 1992 मध्ये त्यांनी दिल्ली येथील सर्व खासदारांची बैठक घेऊन सीमाप्रश्नासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि गृहमंत्री झेल सिंग यांची भेट घेऊन सीमा प्रश्न राष्ट्रीय स्थरावर चर्चा घडवून आणली. सन 2000 मध्ये बेळगाव येथे झालेल्या 73 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला त्यांनी आपला पाठिंबा दिला. 2002 मध्ये त्यांनी बेळगाव ते नागपूर मोटरसायकल मोर्चा काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. या मोर्चाचे शिस्तबद्धरित्या नियोजन करण्यात आले होते परंतु कोल्हापूर जवळच हा मोर्चा आडविण्यात आला आणि सर्व समिती नेते आणि कार्यकर्त्यांना अटक झाली. 2006 मध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव हिवाळी अधिवेशन सुरू केल्यानंतर अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता त्यांनी अनेक महामेळावे यशस्वी केले. महामेळाव्यादरम्यान कन्नड संघटनांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना काळा रंग फसला परंतु दळवी साहेबांनी माघार घेतली नाही. याउलट मराठी भाषिक एकत्र येत सीमा लढा अधिक तीव्र झाला. वेळोवेळी त्यांनी सीमा प्रश्नासाठी सरकार दरबारी आवाज उठवला. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. वेळोवेळी महाराष्ट्र सरकारकडे सीमाप्रश्नी पाठपुरावा केला. हे करत असताना त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्याकडे दुर्लक्ष झाले. अनेक वेळा आर्थिक नुकसान देखील सोसावे लागले. कर्नाटक सरकारने त्यांच्यावर विविध गुन्हे देखील घातले. परंतु सीमा प्रश्न सोडवणूक हा ध्यास मनी बाळगलेल्या दीपक दळवींनी कशाचीही तमा न बाळगतात सीमा प्रश्न सुटावा यासाठी अविरत प्रयत्न केले. “लढण्यासाठी आपल्याकडे हत्यारे नसतील पण मनातील जिद्द ही कोणत्याही अनुभव पेक्षा कमी नसते, जिद्दीची ताकद कधीही शमवू देऊ नका. जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लढत रहा” हा मूलमंत्र त्यांनी तरुणांना दिला.
दीपक दळवी साहेबांनी लढ्यात अनेक तरुणांना सामावून घेत प्रोत्साहन दिले. सीमा लढा हा त्यांनी केवळ जिवंत ठेवला नाही तर तो अधिक धारदार केला. दळवी साहेबांची उणीव भरून काढणे शक्य नाही मात्र त्यांनी पेटवलेली मशाल विजू न देणे आणि सीमा प्रश्न सोडवून घेणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
– शिवानी उमेश पाटील, समिती कार्यकर्त्या.
Belgaum Varta Belgaum Varta