
बेळगाव : “शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज आहे. आपण शिक्षणातून रावण किंवा हिटलर निर्माण न करता श्रीराम निर्माण केले पाहिजेत नव्या शैक्षणिक प्रणालीनुसार हे बदल होतील असा मला विश्वास वाटतो” असे विचार माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री. एम. वीरप्पा मोईली यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सव समारंभाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भरतेशचे चेअरमन श्री. जिनदत्त देसाई हे होते. संस्थेच्या हालगा येथील सेंट्रल स्कूलसमोर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंचावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनींच्या नमोकार मंत्र आणि
नाडगीताने झाली. संस्थेचे सेक्रेटरी श्रीपाल खेमलापुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि हिरक महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
1962 पासून आजवर गेल्या साठ वर्षांत संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा संस्थेचे संचालक विनोद दोड्डनावर यांनी घेतला. “केवळ 15 विद्यार्थ्यावर सुरू झालेली ही संस्था आज आठ हजार विद्यार्थी आठशे कर्मचारी आणि चाळीस एकर जागेत वसलेली आहे “असे ते म्हणाले.
कोमलअन्नानी घातलेल्या भक्कम पायामुळे संस्थेचा वटवृक्ष झाला आहे असे माजी चेअरमन गोपाल जिनगौडा यांनी सांगितले. तर ‘काही माणसे जीवनाला अर्थ देऊन जातात कोमलन्नानी साठ वर्षापूर्वी सेवा भावनेतून केलेल्या कार्यामुळे ही संस्था वाढली’ असे माजी आमदार संजय पाटील म्हणाले.
कोमलअन्ना व सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे ही संस्था वाढल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले आणि संस्थेला आमदार फंडातून वीस लाख रुपयांची देणगी जाहीर केली
सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी, ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचीही यावेळी भाषणे झाली. गणेश हुक्केरी यांनी संस्थेला पाच लाखांची देणगी जाहीर केली याप्रसंगी संस्थेच्या काही निवडक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये अभियंता मधुकेश भुजंग बेळगोजी, मारुती पुणाजी व उदय जिन्नप्पा चौगुले यांचा समावेश होता. याचबरोबर सुनील हनमनावर, प्रमोद पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना विराप्पा मोईली यांनी कोमलअन्ना यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला आणि शिक्षण क्षेत्रात कालानुरूप बदलाची गरज प्रतिपादन केली. बाहुबलीच्यावर महाकाव्य लिहिण्यासाठी मला साडेतीन वर्षे लागली त्याच्या अभ्यासामुळे मी जैन समाजाचा व जैन धर्माचा उत्तम अभ्यास केला असेही ते म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना कोमलअन्ना मला अनेक वेळा भेटले होते त्यांची सामाजिक धडपड पाहून मी त्यांना नेहमी सहकार्य केले होते, असेही मोईली म्हणाले. याच कार्यक्रमात भरतेश सेंट्रल स्कूलचे नामकरण श्रीमती सरोजिनी जिनदत्त देसाई भरतेश सेंट्रल स्कूल असे करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपानंतर भूषण मिरजी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती जोग यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हीरक महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी संचालकांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta