
बेळगाव : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे सलग सोळा वर्षे सामाजिक विधायक उपक्रम राबविले जातात. मागील दोन वर्षे कोरोना काळात बंधने आली होती. मात्र आता शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार ज्ञानदीपतर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी एस. आर. मांगले होते.
ज्ञानदीपतर्फे यापूर्वी क्रीडा विभाग, ओरोस यांच्या सहकार्याने तीनशे वृक्षांची लागवड केली होती, येत्या पावसाळ्यात पुन्हा वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, काव्य लेखन नेहमी प्रमाणे आयोजित केले जाईल. तसेच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व सराव परीक्षेचे आयोजन करणे, ज्ञानदीप महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करुन समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या महिलांचा गौरव करणे, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयक काळजी घेणे आवश्यक असते, यासाठी महिला डॉक्टरांचे व्याख्यान आयोजित करणे, ज्ञानदीप कवी संमेलन, ज्ञानदीप वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून युवापिढीला प्रोत्साहन व प्रेरणा देणे. नवीन सक्रिय सभासद नोंदणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर भेटीगाठी घेणे, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत प्रतिनिधींची नेमणूक करुन शैक्षणिक उपक्रम राबविणे.
दहावी, बारावी परीक्षेत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंतांचा गौरव करणे, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणार्या गुणवंतांचा सत्कार करणे असे कम्प्लीट विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यापूर्वी मंडळाला शासनाचा आदर्श संस्था पुरस्कार मिळाला होता. याचं भान ठेवून विधायक उपक्रमासाठी वेळ देऊन सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा या बैठकीत ज्ञानदीपच्या सदस्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्ञानदीप शैक्षणिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, जावेद शेख, निलेश पारकर (कणकवली), एस. आर. मांगले, विनायक गावस, आर. व्ही. नारकर (कासार्डे), सुनील नेवगी, प्रा. रुपेश पाटील, व्ही. टी. देवण (मळगाव), महेश कांडरकर (तळवडे) आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta