Wednesday , December 10 2025
Breaking News

‘खेलो इंडिया’ मध्ये अक्षताची सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक!

Spread the love


बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने बेंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील ‘2 ऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021’ क्रीडा महोत्सवामध्ये आज मंगळवारी वेटलिफ्टिंगच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले आहे. या पद्धतीने अक्षताने सलग तिसऱ्यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे.

बेंगलोर येथे अखिल भारतीय पातळीवरील 2 रा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021 हा क्रीडा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवातील वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या महिलांच्या 87 किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता कामती हिने आज मंगळवारी ‘स्नॅच’ प्रकारात सर्वाधिक 80 किलो त्याचप्रमाणे ‘क्लीन अँड जर्क’ प्रकारात सर्वाधिक 117 किलो वजन उचलून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) जवाहरलाल नेहरु स्टेडियम नवी दिल्ली येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अक्षता कामती हिला उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा राष्ट्रीय स्तरावरील’संस्थात्मक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात तिने राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले होते.

अक्षता कामती ही गेल्या 2017 सालापासून राष्ट्रीयस्तरावरील महिलांची कनिष्ठ व वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धा आणि खेलो इंडियामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी नोंदवत आहे. याखेरीज अन्य स्पर्धांमध्ये देखील भरीव कामगिरी नोंदविली आहे.
अक्षता हिचा ‘स्नॅच अँड क्लीन जर्क’ या प्रकारात हातखंडा आहे. अक्षताचे राष्ट्रीय स्तरावरील हे सहावे सुवर्णपदक असून
खेलो इंडियामध्ये हॅट्ट्रिक करत तिने सलग तीन सुवर्णपदक हस्तगत केली आहेत.

अक्षताचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हालगा येथील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले असून हरियाणा येथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ती पंजाब येथील लव्हली युनिव्हर्सिटीमध्ये बीएचा अभ्यासक्रम शिकत आहे. अक्षता ही दिवसातून सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळी एकूण जवळपास 6 तास वेटलिफ्टिंगचा सराव करते. तिला प्रशिक्षक वीरूपाल यांचे मार्गदर्शन आणि आई वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल अक्षता कामती हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *