बेळगाव : मुदलगी तालुक्यातील अरभावी येथील सत्तीगेरी मड्डी शिवारातील मशिदीवर अज्ञातांनी भगवा ध्वज फडकावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी पहाटे प्रार्थनेला आलेल्या लोकांच्या निदर्शनास प्रथम ही घटना आली. बुधवारी पहाटे 3.30 ते 5.30 च्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या मशिदीवर भगवा ध्वज फडकावला आहे. नेहमीप्रमाणे आज पहाटे नमाज पडण्यासाठी आलेल्या लोकांच्या निदर्शनास ही घटना येताच वार्यासारखी ही बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर गावातील हिंदू-मुस्लिम समाजाच्या ज्येष्ठांनी शांततेने चर्चा करून भगवा ध्वज मशिदीवरून उतरविला. हा ध्वज मशिदीवर कोण लावला याची माहिती मिळू शकलेली नाही. सध्या गावातील वातावरण शांत आहे. मशीद परिसर व गावात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अरभावी गावच्या उत्तरेला 3 किमीवर असलेल्या सत्तीगेरी मड्डी शिवार परिसरात 645 लोकांची वस्ती आहे.
