बेळगाव : दिलेले कर्ज परतफेड न होण्याच्या आजच्या कठीण काळात ग्राहकांचे हित साधत बेळगावची मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आज आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे ही प्रशंसनीय बाब असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.


स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ला सुरु झालेल्या बेळगावातील मराठा को-ऑप. बँकेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी बेळगावात बँकेचा अमृत महोत्सव शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त बँकेच्या बसवण गल्लीतील मुख्य शाखेला आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे. पाहुण्यांचे मराठा परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले. मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी सकाळी झालेल्या या समारंभात बँकेच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सभासदांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, उपाध्यक्षा नीना काकतकर, ज्येष्ठ संचालक दीपक दळवी, संचालक बाळासाहेब काकतकर, बाबुराव पाटील, लक्ष्मण होनगेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. शरद पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य चित्रकृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार म्हणाले, ग्राहक-सभासदांचा विश्वास, प्रेम, आणि संचालक-कर्मचार्यांचे परिश्रम याच्या बळावर यशस्वी वाटचाल करत बँक आज अमृत महोत्सव साजरा करत आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. 2017 मध्येच बँकेने 75 वर्षे पूर्ण केली मात्र, अमृत महोत्सवाची रूपरेषा तयार करताना मान्यवरांच्या तारखा न मिळाल्याने आणि कोरोना महामारीमुळे हा समारंभ लांबणीवर टाकावा लागला.
बँकेचे ज्येष्ठ संचालक दीपक दळवी म्हणाले, सरकारचे कसलेही सहकार्य नसताना स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठा बँकेने उत्कृष्ट प्रगती साधली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीला प्राधान्य दिले आहे. ग्राहक-सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडवत सहकार क्षेत्रात मराठा बँकेने आपला अनमोल ठसा उमटवला आहे.
त्यानंतर समारंभाला उद्देशून बोलताना शरद पवार म्हणाले, देशात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडूमध्ये देशातील एकूण 50% सहकारी संस्था आहेत. यात यशाचे शिखर गाठलेल्या मोजक्या बँकांपैकी बेळगावची मराठा को-ऑप. बँकही एक आहे ही अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्यापूर्वी 1942 मध्ये सुरु झालेली मराठा बँक आज अमृतमहोत्सव साजरा करीत आहे याचा मला अत्यंत आनंद आहे. इंदिरा गांधींच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. त्या पाठोपाठ सहकार चळवळीला चांगले दिवस आले. देशाच्या प्रगतीत सहकारी संस्थांचे योगदान मोठे आहे. मात्र आता सहकार क्षेत्रात स्वार्थी प्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे ही खेदाची बाब म्हणावी लागेल. कर्जाची परतफेड ही सहकारी बँकांची नाडी आहे हे विसरू नये. संस्थापक, पूर्वीच्या संचालकांनी घालून दिलेल्या शिस्तीच्या मार्गावरून वाटचाल करून बँकांची प्रगती साधली पाहिजे असा कानमंत्र शरद पवार यांनी दिला.
यानंतर मराठा बँकेतर्फे प्रमुख पाहुणे शरदचंद्रजी पवार यांच्या हृदसत्कार करण्यात आला. त्यानंतर मराठा बँकेच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा को-ऑप. बँकेचे संचालक विनोद हंगिरगेकर, सुशीलकुमार कोकाटे, सुनील अष्टेकर, विश्वनाथ हंडे, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, लक्ष्मण होनगेकर, संतोष धामणेकर यांच्यासह सभासद, ग्राहक तसेच शरद पवार यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta