बेळगाव : बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा केली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी बेळगावातील मराठा बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात भाग घेतल्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेतला. याच दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसमवेत शरद पवार यांनी बैठक घेतली.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, संतोष मंडलिक, एस. एल. चौगुले, रावजी पाटील, महेश जुवेकर, विकास कलघटगी, आर. आय. पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत समिती नेत्यांनी सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करण्याची मागणी केली.
सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, खटल्याचा युक्तिवाद प्रभावीपणे व्हावा यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन शरद पवार यांनी समिती नेत्यांना दिले.
बैठकीतील चर्चेसंदर्भात माहिती देताना दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील सद्य परिस्थिती आणि सीमाप्रश्नाविषयी समिती नेत्यांनी शरद पवार यांना माहिती दिली. सीमाप्रश्न समन्वय समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. सीमाभागातील मराठी युवकांचा राष्ट्रीय पक्ष वापर करून घेतात आणि सोडून देतात. त्यामुळे मराठी युवकांनी राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागू नये, असे आवाहन शरद पवार यांना केल्याचे दळवी यांनी सांगितले.
माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, कोरोना संकटामुळे गेली २ वर्षे सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नाच्या खटल्यावर काहीच कामकाज झालेले नाही. सल्लागार समितीचीही बैठक झालेली नाही. कर्नाटकात विरोधी आणि सत्ताधारी पक्ष सीमाप्रश्न संपल्याचे सांगत सुटले आहेत. ही बाब देखील शरद पवार यांच्या निदर्शनास आणली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सीमावासियांच्या पाठीशी असून, सुप्रीम कोर्टात सर्व शक्तीने सीमाप्रश्नाच्या खटल्याचा पाठपुरावा करेल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे, असे किणेकर यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta