आमदारांच्या प्रयत्नातून निधी मंजूर : श्रीनिवास पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांकडून प्रारंभ
अथणी : ऐनापूर-नवलीहाळ रस्त्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याच्या कामाची सुरुवात नुकतीच झाली. भाजपचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या हस्ते या कामाला प्रारंभ झाला. सदर रस्ता व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. परंतु, निधीअभावी या रस्त्याचे काम होत नव्हते. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असून लवकरच या दोन गावांना जोडणारा गुळगुळीत रस्ता वाहनधारकांना मिळणार आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला यापूर्वीच आमदार पाटील यांनी दिलेली आहे. त्यामुळे याचे काम दर्जेदार होईल असा ग्रामस्थांना विश्वास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नेत्यांनी व ग्रामस्थांनी आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.
रस्ता काम प्रारंभ समारंभावेळी भाजप युवा नेते श्रीनिवास पाटील, भाजपचे स्थानिक नेते, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.