
बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. बेळगावात तर काल सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावून शहरवासीयांना चिंब करून सोडले आहे.
बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे शहरातील व्यवसाय गुरुवारी सायंकाळी लवकरच बंद करण्यात आले. पावसामुळे नागरिक लगबगीने घराकडे निघाल्याचे दिसून आले. बाजारपेठेतही सामसूम दिसून आली. शहराच्या अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. अनेक रस्त्यांवर पाणी वाहताना दिसले.
काही विद्यार्थ्यांची शाळेला दांडी!
काल रात्रीपासून सुरु झालेला पाऊस आज शुक्रवार सकाळपर्यंत बरसतच राहिला. त्यामुळे आज सकाळी कामावर जाणार्या नागरिकांची आणि शाळा-कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. काही विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारणे पसंत केले. जिल्ह्यात बेळगाव आणि खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आला.
शेतीसाठी पाऊस पूरक
पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. तथापि, शेतीसाठी हा पाऊस पूरक ठरला आहे. येत्या काही दिवसात असाच पाऊस होत राहिल्यास शेतीच्या मशागतीच्या, पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta