बेळगाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. जगभरात नावाजले गेलेले भारतामधील एक नामवंत वैद्यकीय शिक्षण केंद्र अशी या संस्थेची ओळख आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या रूग्णांवर उपचार होत असतात. या संस्थेचे केंद्र बेळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन गुरुवारी प्रशासनाला सादर करण्यात आले. प्रादेशिक आयुक्त अमलान बिस्वास यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
कर्नाटक राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मंनसुख मांडवीय यांची भेट घेतली होती. तसेच या संस्थेचे केंद्र कर्नाटकात सुरू करण्याच्या दृष्टीने अनुमती मागितली होती. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मंनसुख मांडवीय यांनी होकार दर्शविला आहे. आता तमाम बेळगावकरांनी हे केंद्र बेळगावात व्हावे अशा मागणीसाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. एम्स सारखी संस्था बेळगावात आल्यास बेळगावच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. या दृष्टीने आता ट्विटरच्या माध्यमातून एम्स फॉर बेळगाव हा जागृती उपक्रम सुरू झाला आहे. तसेच आता निवेदनाद्वारे देखील ही मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी प्रोफेशनल्स फोरम संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच. बी. राजशेखर, उपाध्यक्ष अरविंद संगोळी, सचिव पी. एस. हिरेमठ, पदाधिकारी एस. वाय. कुंदर्गी, डॉ. बी. बी. पुट्टी, राजेंद्र मुंदडा, अरविंद पाटील, आय. एम. ए. च्या अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ, डॉ. स्वप्ना महाजन आणि इतर सदस्य उपस्थित होते.