बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकार मराठा समाजाचा राजकीय वापर करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता केली जावी. यासाठी सरकारला 25 जूनपर्यंत मुदत दिली जात आहे. राज्यातील मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, भाजप सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. असा इशारा कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
यावेळी पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, राज्यात मराठा समाजाची एकूण लोकसंख्या 60 लाखाच्या आसपास आहे. बेळगाव जिल्ह्यात 15 लाख मराठा बांधव आहेत. राज्याच्या समाज आणि राजकारणात मराठा समाज महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. गेल्या वीस वर्षांपासून राज्यातील मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध मागण्या केल्या जात आहेत. शंकरप्पा आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र कर्नाटक सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आणि समाज उन्नतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
विद्यमान भाजप सरकार मराठा समाजाच्या सहकार्यामुळेच सत्तेवर आले आहे. मात्र मराठा समाजातील व्यक्तीला मंत्रीपद अथवा नियामक मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलेले नाही. आम.श्रीमंत पाटील यांना अवघ्या सहा महिन्यांचे मंत्रिपद देण्यात आले. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी निगम स्थापन करण्यात आले. 50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मात्र पाच लाख रुपयांचा निधीही मिळालेला नाही. हा मराठा समाजाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्ष मराठा समाजाचा राजकीय वापर करून घेत आहे. भाजपला मराठा समाजाची मते आणि सहकार्य हवे आहे. मात्र मराठा समाजाला अधिकार देण्याची तयारी भाजपची दिसत नाही.
राज्यातील मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत मराठा फेडरेशनचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या मागण्यांची माहिती त्यांना दिली जाणार आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी 25 जूनपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेंगळूर येथे मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्यासाठी पुढील पन्नास विधानसभा आणि पाच लोकसभा मतदारसंघात मराठा फेडरेशनच्या वतीने मराठा उमेदवार निवडणूक लढवतील, असेही श्याम सुंदर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
फेडरेशन उपाध्यक्ष व माजी आमदार मनोहर कडोलकर यांनी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या विरोधात जोरदार टीका केली. येडियुरप्पा हे वचन भ्रष्ट आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी दिलेले वचन पाळलेले नाही. त्यामुळे पुढील काळात मराठा फेडरेशनच्या वतीने समाजाच्या प्रगतीसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगितले. यावेळी भाऊसाहेब जाधव, चिकोडीचे विनायक देसाई, गोकाकचे डॉ. जी. आर. सूर्यवंशी, अनिल माने, हल्याळच्या मंगला तसेच बेळगाव जिल्हा अध्यक्ष वैभव कदम आदी उपस्थित होते.