बेळगाव : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावातून भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला समितीतील दुहीबाबत कानपिचक्या दिल्या आहेत. आगामी काळात शिवसेना म्हणून पुढे येऊ असे त्यांनी म्हटले.
गेले दोन दिवस राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी त्यांची सभा कागल येथे होणार आहे. एकीकरण समितीतील दुहीवर भाष्य करताना आगामी विधानसभा असोत किंवा बेळगावात कोणत्याही निवडणुका असोत शिवसेना स्वबळावर आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांवर लढेल, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
बेळगावसह सीमा भागांत शिवसेना पक्ष संघटना मजबूत करणार असून लवकरच अरुण दुधवाडकर सारख्या नेत्याची शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
बेळगावबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी आक्रमक असतात. बेळगावात मराठी माणसाची सत्ता आली पाहिजे याबाबत देखील ठाकरे आग्रही आहेत. याबाबतीत स्वतः उद्धवजी यांनी आदेश दिला असून लवकरच मी बेळगाव दौऱ्यावर येणार आहे आणि स्वतः लक्ष घालून बेळगावात काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केलं. बेळगावात मराठी नेत्यात असलेल्या फुटीबाबत वक्तव्य करत राऊत यांनी भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला कानपिचक्या दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta