बेळगाव : झारखंड येथील रांची येथे झालेल्या राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून बेळगावमधील लक्ष्मी पाटील या क्रीडापटूने बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.
बेळगाव तालुक्यातील हलगा बस्तवाड या गावातील कुमारी लक्ष्मी संजय पाटील या क्रीडापटूने कुस्ती स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले आहे. रांची येथे झालेल्या स्पर्धेत मिळविलेल्या यशानंतर बेळगावमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मी पाटील हिचे बेळगावमध्ये भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
हल्याळ शाळेतून दहावी पूर्ण केलेल्या लक्ष्मी पाटील हिने झारखंडमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत 15 वर्ष वयोगटात सहभाग घेतला होता. 54 किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये लक्ष्मीने कांस्य पदक मिळवून बेळगावचे नाव उंचावले आहे. आपल्या मुलीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. चार बहिणींमधील लक्ष्मी हि उत्तम कुस्तीपटू आहे, हि अभिमानाची बाब असल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात. लक्ष्मीप्रमाणेच आणखी एक बहीण देखील कुस्ती शिकत आहे. वयाच्या तिसर्या वर्षांपासून कुस्तीचा सराव करणार्या लक्ष्मी पाटील हिने राष्ट्रस्तरावर कामगिरी केली असून लखनौ येथे होणार्या नॅशनल कॅम्प मध्येही ती सहभागी होणार आहे.
आपल्या मुलीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे वडील संजय पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून आपल्या मुलीने मिळविलेले यश हे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
बेळगावमधील लक्ष्मी पाटील या क्रीडापटूने झारखंड येथे मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून लक्ष्मी प्रमाणेच इतर विद्यार्थिनींनी देखील अशा क्रीडा प्रकारात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असा सूर उमटत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta