बेळगाव : बेळगावमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संस्थेचे (एम्स) रुग्णालयात उभारण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगाव शाखेने प्रशासनाकडे केली आहे.
बेळगावमध्ये एम्सचे रुग्णालय झाले तर बेळगांव जिल्ह्यातील गरीब जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळेल. बेळगाव हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारा जिल्हा आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील जनतेलाही अत्याधुनिक वैद्यकीय सोई सुविधा मिळतील. बेळगाव जिल्हा हा राज्यातील दुसर्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याची लोकसंख्याही जास्त आहे. बेळगाव जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत शेजारील जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे तरीही तिथे एम्स हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
काँग्रेसच्या राजवटीत बेळगावमध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा काँग्रेस सरकारने केली होती. मात्र आजतागायत कोणतेही हॉस्पिटल उभारण्यात आलेले नाही. भाजपने आपल्या कार्यकाळात बेळगावमध्ये एम्स रुग्णालय उभारावे, अशी मागणी आपने जिल्हाधिकार्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यावेळी आपचे पदाधिकारी रिझवान अहमद मकानदार, विजय पाटील, संजय काकतकर आदी उपस्थित होते.
