बेळगाव : राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे बेळगावात व्हायचे कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे पीठ कलबुर्गी येथे सुरु झाल्याच्या निषेधार्थ बेळगावात मंगळवारी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार घालून भव्य आंदोलन केले.
बेळगावात राणी चन्नम्मा चौकात मंगळवारी सकाळी वकिलांनी रस्ता रोको करून भव्य आंदोलन केले. निदर्शक वकिलांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांनी निषेध मोर्चा काढला. यावेळी बोलताना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांनी, मंत्री उमेश कत्ती यांच्यासह अनेक नेत्यांना राज्य ग्राहक आयोगाचे पीठ बेळगावात स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले होते, मात्र एकाही नेत्याने या मागणीची दखल घेतली नसल्याचा आरोप केला. ग्राहक आयोगाचे पीठ बेळगावात स्थापन करण्यासाठी अडीज वर्षांपूर्वीच योजना आखण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील नेत्यांच्या इच्छाशक्तीअभावी ते बेळगावात न होता कलबुर्गी येथे कार्यान्वित झाले आहे. सरकारने बेळगावात ग्राहक पीठ सुरु न केल्यास वकील न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन छेडतील असा इशारा यत्नट्टी यांनी दिला.
त्यानंतर बोलताना बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एस. एस. किवडसन्नावर म्हणाले, बेळगावात सुरु व्हायचे हायकोर्ट बेंच धारवाड जिल्ह्याला देण्यात आले. बेळगावातील वकिलांच्या आंदोलनामुळे राज्य ग्राहक आयोगाचे पीठ स्थापन करण्याची योजना आखण्यात आली. मात्र मंत्री उमेश कत्ती यांचे दुर्लक्ष, राजकारण्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हे पीठ आता कलबुर्गी येथे सुरु करण्यात आले आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर निदर्शक वकिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना दिले. यावेळी हणमंत कोंगाली, आर. पी. पाटील, आर. के. बिरादार, जगदीश सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
