बेळगाव : बेळगाव शहरात 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या 4 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली आहे.
बिम्स आवारातील सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची आमदार अनिल बेनेके यांनी आज मंगळवारी बिम्सचे संचालक ए. बी. पाटील यांच्यासह कंत्राटदार आणि अन्य अधिकार्यांसमवेत पाहणी केली. या पाहणी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
बेळगावात अत्याधुनिक सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली जात असल्याचा आपल्याला अभिमान असून हॉस्पिटलचे बांधकाम 2018 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोना तसेच लॉकडाऊन यामुळे बांधकाम वेळेत पूर्ण न होता रखडले होते. मात्र आता हे काम पूर्णत्वास आल्याचे आमदारांनी सांगितले.
सदर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत चार मजल्यापर्यंत बांधली जात आहे. एका मजल्यावर चार तर हॉस्पिटलमध्ये आठ विभाग बांधण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि इंडो क्रोनोलॉजी विभाग असणार आहे. तसेच तिसऱ्या मजल्यावर व्हीआयपी रूम, जनरल रूम आणि चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर्स असतील.
या हॉस्पिटलचे येत्या 4 महिन्यांत पूर्ण होईल. कंत्राटदार आणि अभियंता यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले असले तरी मुदतीत शक्यतो लवकर काम पूर्ण करावे, अशी सूचना आपण केली असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
आई -मुलांचे रुग्णालय, डिलिव्हरी वॉर्ड, ट्रॉमा सेंटर आणि नर्सिंग कॉलेजही येत्या 3 महिन्यांत सुरू होणार आहे. संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हे हॉस्पिटल मोफत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरिता देशाच्या पंतप्रधानांना बोलवण्याचा मानस असल्याचेही सांगितले.