
आ. श्रीमंत पाटील यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांकडून विद्युत पंप सुरू
अथणी : पावसाने ओढ दिल्याने अथणी व कागवाड तालुक्यातील काही गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपण बंगळूरला असलो, तरी शेतकरी व नागरिकांचे हाल नकोत, यासाठी ऐनापूर कालव्याद्वारे पाणी सोडा, अशी सूचना माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी अधिकार्यांना दिली. त्यानुसार पूजन करून 8 ते 10 गावांना पाण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आले.
अद्याप पावसाला म्हणावी तशी सुरवात झालेली नाही. त्यामुळे दुष्काळी गावांना अद्यापही पाणी टंचाई जाणवत आहे. शेती, जनता तसेच जनावरांच्या पाण्याची सोय नाही. यासाठीच बंगळूरला असलेले आ. श्रीमंत पाटील यांनी माझी वाट न पाहता जनतेला पाणी द्या, अशी सूचना पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांना केली. त्यानुसार मंगळवारी मोळे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष भुताळी थरथरे यांच्या हस्ते पूजन करून ऐनापूर जॅकवेलमधील मोटारींची पूजा करून पाणी सोडण्यात आले.
यावेळी ऐनापूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रशांत पोतदार म्हणाले, आमदारांच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात एका मोटारीने कालव्याद्वारे पाणी सोेडण्यात येत आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन भविष्यात अन्य मोटारी सुरू करून पाणी कालव्यात सोडले जाईल. या भागातील 21 हजार हेक्टर शेतीला व जनतेला हे पाणी वरदान ठरणार आहे.
आमदारांचे स्वीय सहायक सचिन देसाई म्हणाले, गेल्या वर्षी दुष्काळी काळात या भागातील नागरिक व जनावरांच्या पाण्याची टंचाई झाली होती. तेव्हा आमदारांनी पहिल्यांदा प्रादेशिक आयुक्तांना विनंती करून कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला होता. दहा गावांसाठी या पाण्याचा वापर होत असून त्यांच्या सूचनेनुसार आता पुन्हा पाणी सोडले जात आहे. यावेळी मोळे ग्रामपंचायत सदस्य बाळाप्पा नरट्टी, धर्माजी कोळेकर, महादेव कोळी, ऐनापूर पाटबंधारे खात्याचे बी. बी. गलगली, सागर पवार, शेतकरी नेते सुरेश हळ्ळोळी, गजानन मुंजे, मधु थरथरे, दिलीप भरमवडेयर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta