बेळगाव (प्रतिनिधी) : उचगाव येथील शेतकऱ्याने आपल्या राहत्या घराशेजारील शेतवडीतील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. घरच्या भाऊबंदकीच्याच शेतीच्या पैशांच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातून ही आत्महत्या त्याने केल्याचे त्यांच्या मुलाकडून सांगितले जात होते.
या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी की, श्रीकांत शंकर जाधव (वय 56) हा सकाळी दहाच्या सुमाराला घरातून बाहेर शेतावरती गेल्याचे सांगण्यात येत होते. दुपारी तो घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू असताना घराच्या गच्चीतून आंब्याच्या झाडाला मृतदेह लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांच्या राजू नावाच्या मुलाने या आंब्याच्या झाडाकडे धाव घेतली तर आपले वडील श्रीकांत जाधव यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. ते मरण पावल्याचे समजताच त्यांच्या पत्नी व मुलाने एकच हंबरडा फोडला. याबाबत काकती पोलीस स्टेशनच्या अधिकारी वर्गाने घटनास्थळी भेट देऊन त्याचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta