बेळगाव : विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदव्यूत्तरच्या अंतिम वर्षातील परीक्षा चार दिवस पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा मंगळवारपासून होणार होत्या. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात सोमवारी आंदोलन केल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या असून सदरच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.
विद्यापीठाने गेल्या वीस दिवसांपुर्वी मागील सेमीस्टरच्या परीक्षा घेतल्या होत्या. महिनाभरातच पुन्हा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन केले जात असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत होती. मंगळवारपासून परीक्षा सुरु होणार होत्या. यावेळी ऑनलाईन वर्ग घेण्यात आले होते. तसेच ऑफलाईन परीक्षांचे आयोजन केले जात आहे. महिनाभरात दुसरी सेमीस्टर असल्याने विद्यार्थ्यांना मानसीक तयारी केलेली नव्हती. यामुळे परीक्षा रद्दची मागणी जोर धरू लागली होती.
विद्यापीठातील पदव्यूत्तरच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाचे नियोजन केले होते. त्यानुसार सोमवारी विद्यापीठ आवारात आंदोलन करण्यात आले. दुपारी 2 पर्यंत विद्यापीठ 14 तारखेपासूनच परीक्षा घेण्यावर ठाम होते. विद्यापीठाची भूमीका ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील कडक पवित्रा घेतला. यातील काही विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा विद्यापीठाला दिला. यासाठी रॉकेलचे दोन डबे विद्यार्थिनीनी आणले होते. यामुळे विद्यापीठाने सावध पवित्रा घेत चार दिवस परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. तत्पूर्वी कुलगुरुंनी काही विद्यार्थ्यांना आत बोलवून चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठ आवारात गर्दी केली होती.
