बेळगाव (प्रतिनिधी) : राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी मार्गसूचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठात व्हाईस चान्सलर प्रो. एम. रामचंद्र गौडा व रजिस्ट्रार प्रो. बसवराज पद्मशाली यांच्या हस्ते करण्यात आले. अध्ययन मंडळ अध्यक्ष डॉ. चंद्रकांत वाघमारे यांचीही यावेळी उपस्थिती होती. कोविड मार्गसूचीनुसार मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पाठ्यपुस्तकांचे संपादक व आरपीडी कॉलेजचे हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र पोवार, राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष व सहाय्यक संपादक प्रा. शंकरमूर्ती के. एन., संघाचे सेक्रेटरी व सहाय्यक संपादक डॉ. डी. एम. मुल्ला, डॉ. अमित चिंगळी व डॉ. महादेव संकपाळ उपस्थित होते.
डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी स्वागत केले व नवीन हिंदी पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकांबद्दल माहिती दिली. डॉ. राजेंद्र पोवार हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य असून त्यांनी हिंदी पाठ्यक्रम वेळेत तयार केला, तसेच अन्य प्राध्यापकांच्या सहकार्याने पाठ्यपुस्तकेही वेळेवर प्रकाशित झाल्याबद्दल व्हाईस चान्सलरनी सर्वांचे अभिनंदन केले.
बी.ए./बीएसडब्ल्यू/सीसीजे द्वितीय सत्रासाठी ‘काव्य कलश’ व ‘पद्य परिमल’ ही दोन पुस्तके, बीकॉम/बीबीए द्वितीय सत्रासाठी ‘काव्य वैभव’ तर बीएससी/ बीसीए द्वितीय सत्रासाठी ‘काव्य कुसुम’ ही पुस्तके अभ्यासक्रमासाठी आहेत.
Check Also
कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात
Spread the love बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक …