बेळगाव : रायचूर-बाची राज्य महामार्गावर येणार्या बेळगाव-सांबरा रस्त्यादरम्यान सहा पदरी किंवा चौपदरी रस्ता बांधकामासंदर्भातील योजनेवर स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजूर करण्यात येईल, असे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
कर्नाटक विकास कार्यक्रम अर्थात केडीपीची पहिली तिमाही बैठक आज मंगळवारी सुवर्ण विधान सौध येथे घेण्यात आली. प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री गोविंद कारजोळ बोलत होते. या प्रकल्पाशी संबंधित प्रस्तावाचा सर्वंकष अभ्यास करून लवकरात लवकर मंजुरी दिली जाईल. सहा पदरी रस्त्यासाठी 112 कोटी तर चौपदरीकरणासाठी 84 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी आरोग्य खात्यात इतरत्र नियुक्त केलेल्या डॉक्टरांना मूळ ठिकाणी नियुक्त करण्याची गरज आहे. मात्र अद्याप बैलहोंगल तालुका रुग्णालयात डॉक्टर नियुक्त न केल्याने आमदार महांतेश कौजलगी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. पाच महिन्यांपासून शल्यचिकित्सक नसल्याने लोकांची काय परिस्थिती आहे, असा सवाल त्यांनी केला.
यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही आवाज उठवल्याने बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्याला उत्तर देताना मंत्री कारजोळ यांनी तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. त्याचवेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरकारी जागांवर अतिक्रमण करून त्यांचे उतारे अतिक्रमणकर्त्यांना दिल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गोविंद कारजोळ संतापले. सरकारी जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये. त्यामुळे शासकीय जागांवर अतिक्रमण करणार्यांना सहकार्य करू नये, संबंधित अधिकार्यांनी 24 तासांच्या आत त्या जागा ताब्यात घ्याव्यात अन्यथा त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
वनमंत्री उमेश कत्ती, आमदार दुर्योधन ऐहोळे, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.