बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांनी बी-समरी रिपोर्ट सादर केल्याच्या निषेधार्थ संतोष पाटील यांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बेळगाव तालुक्यातील बडस गावात आंदोलन केले. यावेळी माझ्या पतीच्या मृत्यूला न्याय मिळाला नाही, त्यामुळे ईश्वरप्पा हेच माझ्या मृत्यूचे कारण असल्याची डेथ नोट लिहून मी आत्महत्या करेन, असा इशारा संतोषची पत्नी जयश्री यांनी दिला.
माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्या विरोधात 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करून आत्महत्या केलेल्या संतोष पाटील या कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात उडपी पोलिसांनी बी-समरी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे ईश्वरप्पा यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष पाटील कुटुंबियांनी त्यांच्या बडस गावातील राहत्या घरासमोर निदर्शने केली. त्यांनी काल रात्री धरणे देऊन ईश्वरप्पा आणि उडुपी पोलिसांचा निषेध केला. न्याय मिळेपर्यंत लढा देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी गावकर्यांनीही निदर्शनात सहभागी होऊन पाटील कुटुंबियांना साथ दिली. दरम्यान, संतोषची पत्नी जयश्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या पतीच्या मृत्यूला ईश्वरप्पाच कारणीभूत आहेत असे त्यांनी डेथ नोटमध्ये लिहिले होते. माझ्या नवर्याचा फोन चार तास सुरु होता. साक्षीदारही होते. ग्रामपंचायत अध्यक्षांनी केलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, प्रभावशाली राजकारण्याने दबावाखाली पोलिसांनी प्रकरणच दडपून टाकल्याचा आरोप केला. आत्महत्येच्या बाबतीत माझ्या पतीने लिहिलेली डेथ नोट विचारात घ्यावी. व्हॉट्सअपवर डेथ नोट लिहिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मग मीही आता माझ्या हाताने माझ्या पतीच्या मृत्यूचे कारण ईश्वरप्पा आहे अशी डेथ नोट लिहून मरेन. ती तर पोलिस मान्य करतील का? असा प्रश्न करून या प्रकरणातील सत्य बाहेर यायचे असेल तर त्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
ईश्वरप्पा यांनी पोलीस तपासात प्रभाव वापरून हस्तक्षेप केला. त्यामुळेच साक्षीदार नसल्याचे पोलिस सांगत आहेत. त्यांच्याबाजूने तपास केला जात असल्याचा संशय आल्याने आम्ही राज्यपालांना पत्र लिहिले आहे. तपास अधिकार्यांनी दहा दिवसांत तीन नोटिसा बजावल्या आहेत. आम्ही ज्यांना फोन केला त्यांनी आमचा फोन घेतला नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन माझ्या पतीला न्याय द्यावा, अशी मागणी संतोषची पत्नी जयश्री यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta