कर्नाटक सरकारला उचगाव ग्रामस्थांचा इशारा
बेळगाव : उचगाव फाट्यावरील कमानीला हात लावाल तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा खणखणीत इशारा कर्नाटक सरकारला उचगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
स्वागत कमानीवरील मराठी व कन्नड मजकुरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिकारी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आले होती.
या बैठकीत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शवत सरकारला उपरोक्त इशारा दिला आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जिल्हा पंचायत अधिकारी बसवराज, तालुका पंचायत सीईओ राजेश धनकवडकर, सीपीआय गुरूनाथ व पीडीआय वासुदत्त व अधिकारी उपस्थित होते. सरकारी आदेशानुसार कोणालाही त्रास न देता स्वागत कामानीवरील मजकूर हटविण्यात यावा, अशी विनंती यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केली.
मात्र संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची विनंती फेटाळून लावत कोणत्याही परिस्थितीत स्वागत कामानीवरील मराठी मजकूर बदलला जाणार नाही. कमानीला हात लावाल तर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असे उचगाव ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
उचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बाळ देसाई म्हणाले की, सरकारी नियमानुसार नामफलकाच्या बाबतीत 60 टक्के कन्नड मजकूर आणि 40 टक्के अन्य भाषेतील मजकूर असा कायदा आहे तर मग त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्वच सरकारी कार्यालयांच्या बाबतीत का घडत नाही. सरकारी कार्यालयावरील फलकांवर कन्नड सोबत मराठीतून लिहिले जावेत तरच आम्ही आमच्या स्वागत कामानीवरील मजकूर हटवू, असेही बाळ देसाई यांनी सांगितले.
उचगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, जोपर्यंत सरकारी कार्यालयावर मराठी मजकूर लिहिला जात नाही तोपर्यंत स्वागत कामानीवरील मजकूर हटविले जाणार नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. तसेच पोलिसी बळाचा वापर करून जबरदस्तीने स्वागत कमानीवरील मजकूर हटविण्याचा प्रयत्न झाल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा उचगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
मराठी मतांच्या जीवावर सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वागत कमानीवरील मजकुराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील उचगाववासीयांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta