बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. या बैठकीत मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीतून मिळावी या मुख्य मागणीसह कन्नड प्राधिकरणाकडून मराठीची होणारी गळचेपी, उचगाव येथील स्वागत कमानीवरील मजकुराबाबत तसेच स्थानिक आमदारांनी समितीबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
बैठकीनंतर दीपक दळवी यांनी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीसमोर करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती दिली. सर्वोच न्यायालयाने भाषिक अल्पसंख्याकाची शहानिशा करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले असून त्यासाठी मुदत दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा स्थानिक मराठी माणसांच्या जीवावर निवडून आलेल्या स्थानिक आमदारानी व्यवस्थित अभ्यास करावा त्यानंतर अकलेचे तारे तोडावे व त्यानंतर म. ए. समितीशी भांडावे, असे दळवी यांनी सांगितले. तर समितीचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उचगाव येथील स्वागत कमानीच्या कानडीकरणाचा घाट घातला आहे तो कदापि यशस्वी होणार नाही. ही प्रशासनाकडून करण्यात येणारी केवळ एक केविलवाणी धडपड आहे. उचगाव हे मराठी बहुभाषिक गाव आहे. गावात 100 टक्के मराठी भाषिक आहेत. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार स्वागत कमानीवरील मजकूर हा मराठीतच असेल. कायद्याच्या नावाखाली मराठी भाषिकांवर दडपशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारने सर्वप्रथम हा कायदा सरकारी कार्यालयात लागू करावा त्यानंतर आम्हाला कायद्याचे ज्ञान द्यावे. कमानीबाबत कोणतेही दबावतंत्र वापरल्यास मराठी भाषिक कदापि सहन करणार नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला मध्यवर्ती समितीचे सदस्य उपस्थित होते.