बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे आयुर्वेदाचे फायदे व उपचार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
प्रारंभी लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सरकारची आहे. इंग्लंडमध्ये ती सरकार घेते. तशी ती आपल्या सरकारनेही घ्यावी असे सांगितले.
यानंतर बोलताना सुहास देशपांडे यांनी आयुर्वेदाविषयी सखोल माहिती दिली. प्रत्येकाला कोणता ना कोणता रोग असतो. पण तो अचानक होत नाही. त्याची सुरुवात पाचसहा वर्षे आधीपासून होत असते. त्यामुळे तो एकदम बरा होता नाही. त्याला विलंब लागतो. पण आयुर्वेदामुळे तो समूळ नाहीसा होतो, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य चांगले राहाण्यासाठी जास्त पाणी प्यावे, वेळेवर नाश्ता व आहार घ्यावा, रात्री लवकर झोपावे. तसेच रोजच्या व्यायामात खंड पडू देऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.
आयुर्वेदाचे औषध घेतलेल्या प्रा. दत्ता नाडगौडा व इतरांनी आपल्याला आलेला अनुभव सांगितला. या औषधामुळे आपल्याला गुण आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या शंकाचे देशपांडे यांनी निरसन केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यास संभाजी पाटील यांनी सहकार्य केले. लेखक संघाचे सरचिटणीस कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले. गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta