Thursday , September 19 2024
Breaking News

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

Spread the love

 

बेळगाव : भारतीय सैन्याची शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस महत्वाचा आहे. हा दिवस याची आठवण करून देतो की, आपले कित्येक जवान हसत हसत शहीद झाले पण देशासाठी प्राणपणाला लावून लढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना कारगिल युद्धात करावा लागला. अन्न नाही, झोप नाही, वातावरणही पोषक नसताना देखील भारतीय सैन्याने शेवटी विजय प्राप्त केला. आमचे बंकर शत्रू सैन्याकडून उडवले जायचे तेव्हा थरकाप उडायचा. परंतु मोठ्या धैर्याने आणि शौर्याने आम्ही लढलो आणि हा ऐतिहासिक विजय मिळवला. या पराक्रमाची प्रेरणा घेऊन तरुणांनी देशसेवेसाठी तयार राहायला हवे. असे प्रतिपादन सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन भीमराव खानई यांनी केले.

शिवानंद महाविद्यालयातील एनसीसी विभागातर्फे कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भीमराव खानई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एस तुगशेट्टी होते. व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी प्रोफेसर बी. ए. पाटील, उप प्राचार्य डॉ. एस. ए. करकी, एनसीसी ऑफिसर प्रा. अशोक आलगोंडी होते.
प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना कँडल लायटिंग करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत डॉ. एस. ए. करकी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक आलगोंडी यांनी करून दिला.
यावेळी प्रो. बी. ए. पाटील म्हणाले, अलीकडे नागरिकांमध्ये देशभक्ती कमी होत चालली आहे. कारगिल युध्दातल्या एकेक कहाण्या ऐकल्या किंवा वाचल्या की अंगावर शहारे उभे राहतात. कारगिल विजय दिवस साजरा करण्याचा उद्देशच हा आहे की, युद्धात योगदान दिलेल्या भारतीय जवानांची आठवण ठेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य व्ही. एस. तुगशेट्टी म्हणाले, 1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी भारतात दर 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. सुरुवातीला, पाकिस्तानी सैन्याने त्यांचा सहभाग नाकारला. परंतु भारताने त्यांची पितळ उघडे पाडले. भारत भूमीत घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला आक्रमकतेने माघारी पाठवले. यावेळी एनसीसीच्या कॅडेट्सनी देखील आपले मनोगत मांडले.
कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या दहा वीर जवानांचा सन्मान करण्यात आला. माजी एनसीसी विद्यार्थी आकाश कांबळे आणि रोहन वडार हे सैन्यात भरती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या एनसीसी कॅडेटना गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी विद्यार्थी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट रुचिता मल्लेवाडी यांनी केले तर आभार कॅडेट कावेरी बायकुड यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *