उगार बुद्रुकजवळील परमेश्वरवाडी येथे हस्तांतर : आ. श्रीमंत पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे अभिनंदन
कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक जवळील परमेश्वरवाडी गावात स्मशानभूमी नव्हती. याची दखल घेऊन माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावाला 1 एकर 36 गुंठे शेतजमीन शासनाकडून खरेदी करून मिळाली. याचे हस्तांतर नुकतेच आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येथे पूजा करून त्यांच्या हस्ते रोपटीरोपण करण्यात आले.
उगार बुद्रुक व परमेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले की, आमच्या गावात एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती. परंतु आमदारांनी यासाठी जागा उपलब्ध करून देऊन पुण्याचे काम केले आहे.
परमेश्वरवाडी येथील मंदिरात आयोजित सभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, या स्मशानभूमीसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्मशानभूमी ही पवित्र जागा आहे, ती स्वच्छ आणि सुंदर ठेवा, येथे लावलेली रोपटी जगवा, आणखी रोपटी लावा, येथील पावित्र्य राखा, काही अडचण असल्यास थेट भेटा, असे आवाहन त्यांनी केले.
कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली म्हणाले की, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या उगार बुद्रुक गावातील स्मशानभूमीचे काम आता पूर्ण झाले आहे. हे काम अनेक दिवसांपुर्वी पार पडले असते. परंतु, स्मशानभूमीसाठी जागा द्यायला कोणीही तयार नव्हते. पण, आमदारांच्या अथक प्रयत्नामुळे शेतकर्यांची खात्री पटली आणि शेवटी स्मशानभूमीसाठी जागा मिळाली.
स्मशानभूमीसाठी जागा देणाऱ्या कुटुंबाचा आमदारांनी सत्कार केला. यावेळी कागवाड ता. पं. कार्यकारी अधिकारी वीरनगौडा एगनगौदरा, विभागीय वनाधिकारी श्री. प्रशांत गंगाधर, महसूल निरीक्षक श्री. एस. बी. मुल्ला, ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णागौडा शीतल पाटील, नेते मनोज कुसाळे, चौगले, भारत होसुरे, संदीप काटकर, लक्ष्मण जाधव, जयपाल सांगवडे, रवी कामटे, प्रशांत होसुडे, अन्य नेते, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta