आ. श्रीमंत पाटील : पुरेपूर निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
अथणी : खिळेगाव -बसवेश्वर पाणी योजनेसाठी अनुदानाची कमतरता नसून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कडक सूचना दिली आहे. आपण दिलेल्या आश्वासनानुसार डिसेंबरअखेरपर्यंत ही योजना पूर्ण करू. अथणी व कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खिळेगाव-बसवेश्वर योजनेचे पाणी देणे हे आपले स्वप्न आहे आणि ते आपण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच, असा पुनरुच्चार माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी केला.
अथणी येथे पाटबंधारे खात्याचे अधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे अध्यक्ष यांची त्यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, दिली या पाणी योजनेविषयी मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्यासोबत अनेकदा बैठक झाली आहे. आपल्या समोरच त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून घेत या योजनेसाठी अनुदानाची अजिबात कमतरता करू नका, असा आदेश दिला आहे. मी व्यक्तिगतरीत्याही या कामावर सातत्याने लक्ष ठेवून आहे दुष्काळी भागातील जनतेला व शेतकऱ्यांना या योजनेचे पाणी देऊन हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचे आपले स्वप्न आहे ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांना बोलावून डिसेंबरअखेर याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मी बोलणार तसे करून दाखवणार आहे. एकदा हाती घेतलेले काम पूर्ण करून त्यानंतरच दुसऱ्या कामाला हात घालणारा मी व्यक्ती आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीतून तलाव भरण्याच्या कामाचाही शुभारंभ त्याचवेळी करण्यात येणार. आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खिळेगाव ग्रामपंचायत अध्यक्ष रवी नागोळ, दऱ्याप्पा होनागोळ, मलाबाद ग्रामपंचायत अध्यक्ष बिराप्पा उगारे, शिरूर ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू हजारे, अधीक्षक अभियंते बी आर राठोड, अभियंता के रवी, प्रवीण हुनशीकट्टी, दादा पाटील व डी के पवार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta