Monday , December 8 2025
Breaking News

मुसळधार पावसातही म. ए. समितीची निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषिकांना कायद्यानुसार मराठी भाषेतच सरकारी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी मुसळधार पावसातही शेकडोंच्या संख्येने जमलेल्या मराठी भाषिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
पावसाच्या अस्मानी संकटाला तोंड देत न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा वज्रनिर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला. सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठीत देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश असताना आणि तसा केंद्र व राज्य सरकारचाही कायदा असल्याने मराठी भाषेत सरकारी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने लढा सुरु ठेवला आहे. यापूर्वी 27 जुन रोजीही बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढून ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अशाप्रकारचा कोणताही शासन आदेश नसल्याचे बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले होते. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म. ए. समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मराठी भाषिकांचे हक्क डावलत असल्याचा आरोप मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केला.
यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषक अल्पसंख्याकांना सरकारी कागदपत्रे मराठी भाषेत द्यावीत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा तसा कायदाही आहे. मात्र बेळगावचे जिल्हाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला कोणतीही किंमत न देता राज्य सरकारच्या इशार्‍यावर नाचत आमचे म्हणणे ऐकून न घेता असा कोणताही आदेश नसल्याचे सांगत कायद्याकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे ते येथील मराठी भाषिकांचे हक्क दडपत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी सर्वांना न्याय देण्याची शपथ घेऊन सनदी सेवेत आलेल्या आयएएस अधिकार्‍याने मराठी भाषिकांचे हक्क डावलून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात यापूर्वीही अनेक आंदोलने करण्यात आली आहेत आणि सरकारला याचिका सादर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत कार्यवाही करून आम्हाला मराठी भाषेतून कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिलाम. ए. समितीच्या या ठिय्या आंदोलनावेळी मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र त्याची पर्वा न करता समिती कार्यकर्त्यांनी छत्र्या घेऊन, जाकीट घालून धरणे आंदोलनात भाग घेतला. बेळगाव शहरासह तालुका, खानापूर, निपाणी आदी सीमाभागातून ठिकठिकाणांहून आलेल्या मराठी भाषिकांनी या आंदोलनात भाग घेतला. महिला आंदोलकांची संख्याही लक्षणीय होती.
माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आर. आय. पाटील, मनोज पावशे, एस. एल. चौगुले, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, विकास कलघटगी, तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष समितीचे संतोष मंडलिक, आबासाहेब दळवी, डी. बी. मोहनगेकर, टी. के. पाटील, सुहास किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, शिवानी पाटील, साधना पाटील, मदन बामणे, चंद्रकांत कोंडुस्कर, महेश जुवेकर, गोपाळ देसाई, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, धनंजय पाटील, किरण हुद्दार, यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *