
बेळगाव : सामाजिक समतेचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री डी. देवराज अरसू यांची 107 वी जयंती बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
बेळगाव शहरात आज, शनिवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, मागासवर्गीय कल्याण विभाग, महानगर पालिका आणि देवराज अरसू विकास महामंडळ यांच्या सहयोगाने सामाजिक समतेचे प्रणेते माजी मुख्यमंत्री देवराज अरसू यांच्या 107 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देवराज अरसू यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार अनिल बेनके, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच.व्ही., कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री, ओबीसी कल्याण विभागाचे उपसंचालक लक्ष्मण बबली आदी मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी आमदार, जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांनी प्रार्थना व घंटानाद करून मिरवणुकीला चालना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून निघालेली ही मिरवणूक चन्नम्मा सर्कल, कृष्णा देवराय सर्कल मार्गे कुमार गंधर्व सभागृहात येऊन मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी विविध कला पथकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन कला सादर केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना, ओबीसी कल्याण विभागाचे उपसंचालक लक्ष्मण बबली म्हणाले की, शासनाच्या परिपत्रकानुसार आम्ही तीन दिवस देवराज अरस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विशाल जिल्ह्यातील विविध खात्यांच्या सहकार्याने आम्ही तीन दिवस विशेष कार्यक्रम साजरा करत आहोत. शासनाच्या आदेशानुसार यावर्षीपासून देवराज अरस यांच्या नावाने जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येत आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड करून या वेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी आणि इतर कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta