अथणी येथे ३२ जणींवर उपचार : मृत बस चालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन
अथणी : दोन दिवसांपूर्वी अथणीजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी भेट घेतली. डॉक्टरांकडून उपचाराबाबत माहिती घेताना उपचारात हयगय करू नका, अशी सूचना त्यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस करत धीर दिला. या अपघातात मृत पावलेल्या बस चालकाच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचेही आमदारांनी सांत्वन केले.
शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अथणीपासून एक किलोमीटरवर बनजवाड पीयु कॉलेजच्या वसतीगृहात राहणार्या विद्यार्थिनींच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पोचालक तसेच बसचालक निवृत्त सैनिक रघुनाथ अवताडे या दोघांचा मृत्यू झाला. बसमधील शिक्षिकेसह 37 विद्यार्थी जखमी झाले. यापैकी 32 विद्यार्थिनींवर अथणी येथील तीन खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आ. श्रीमंत पाटील यांनी या सर्व विद्यार्थिनींची भेट घेऊन विचारपूस केली. आपला अनुभव सांगताना काही विद्यार्थिनींनी बसचालक स्व. रघुनाथ अवताडे यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले. या सर्व विद्यार्थिनींना धीर देताना काळजी न करण्याचे आवाहन केले. डॉक्टरांकडून तसेच वैयक्तीक काही गरज भासल्यास आपल्याशी संपर्क साधण्याची विनंती त्यांनी या विद्यार्थिनींच्या पालकांना केली. उपचारानंतर डॉक्टर सांगतील तितकी विश्रांती घेऊन मगच कॉलेजला जाण्यासही त्यांनी सांगितले. यावेळी अथणीचे तहसीलदार सुरेश मुंजे, पोलिस निरीक्षक रविंद्र नायकवडी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यानंतर आमदार श्रीमंत पाटील यांनी अथणी तालुक्यातील कोडगनूर येथील निवृत्त सैनिक व या अपघातात मृत पावलेले बस चालक रघुनाथ अवताडे यांच्या घरी भेट देऊन या कुटुंबाचे सांत्वन केले.