बेळगाव : बेळगावचे प्रसिध्द पखवाजवादक व तबला शिक्षक हभप यशवंत पांडोबा बोंद्रे व कीर्तनकार गिरीश जोशी यांचा पुण्यातील एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्र धर्म जागरण अभियानतर्फे हजार कीर्तनाचा संकल्प करण्यात आला होता. त्या संकल्पपूर्ती निमित्ताने कीर्तनाला साथसंगत करणार्या साथीदारांचाही गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम दि. 21 ऑगस्ट रोजी गीता धर्म मंडळाच्या सभागृहात पार पडला. यामध्ये बोंद्रे आणि जोशी यांना मान लाभला. हभप मोरेश्वरबुवा जोशी व रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक मा. श्री. वंजारवाडकर यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार वामनबुवा कोल्हटकर, वेद वासुदेव प्रतिष्ठानचे प्रमुख प. पू. अजितदादा तुकदेव, निवृत्त एअरमार्शल प्रदीप बापट, ज्येष्ठ नेते शशिकांतभाऊ सुतार, क्रांतिकारक राजगुरु यांचे वंशज सत्यशील राजगुरु आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक व गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुकुंद दातार उपस्थित होते. बोंद्रे आणि जोशी यांचा सत्कार म्हणजे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta