बेळगाव : गोकाक (जिल्हा-बेळगाव) मधील आपले सोन्याचे दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला दुचाकीवरून जात असताना राज्य महामार्गावर 8 दरोडेखोरांच्या टोळक्याने व्यापाऱ्यांवर हल्ला करून अर्धा किलो सोने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. घटप्रभा पोलीस स्थानक कार्यक्षेत्रांतर्गत शुक्रवारी साडे आठ-नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संजीव सदानंद पोतदार आणि रवींद्र सदानंद पोतदार हे दोघे भाऊ गोकाकमध्ये सोन्याचे दुकान चालवितात. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून हे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे दुचाकीवरून घरी सिंधी कुरबेटला जात होते. यावेळी चार दुचाकीवरून आलेल्या या दरोडेखोरांनी राज्य मार्गावरील घटप्रभा साखर कारखान्यानजीक करीयम्मा देवाच्या मंदिराजवळ पोतदार बंधूंच्या दुचाकीला मागील बाजूने ठोकर मारली. यावेळी पोतदार बंधूंचा दुचाकीवरील तोल गेला. ही संधी साधून त्यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोतदार बंधूंनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी दोघांपैकी एकाच्या डोकीत तर दुसऱ्याच्या कानावर रॉडने वार केला. रॉडच्या प्रहाराने पोतदार बंधू जखमी झाले. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
जखमी संजीव व रवींद्र पोतदार यांना उपचारासाठी घटप्रभातील केएचआय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta