बेळगाव : जायंट्स भवनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या रविवारी सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जायंट्स भवनाचे अध्यक्ष श्री. पी. आर. कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि लोटस इंजिनिअरिंगचे मालक श्री. जे. डी. देसाई हे उपस्थित होते. व्यासपीठावर भवनाचे उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर हेही उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात ज्या जायंट्स सभासदांच्या नातेवाईकांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सेक्रेटरी शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. आर. कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून पाहुण्यांचा व अलीकडेच सेवानिवृत्त झालेले डॉ. विनोद गायकवाड यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. विनोद गायकवाड यांनी करून दिल्यावर पाहुण्यांच्या हस्ते जायंट्स भवनाच्या उभारणीत कार्य केलेल्या मोहन कारेकर आणि इतर माजी अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. गतसालच्या जमाखर्चास मंजुरी दिल्यानंतर लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आणि जायंट्स भवनाच्या कार्यकारणीत सध्या असलेल्या अकरा सदस्यांच्या मध्ये चार जणांची वाढ करून 15 सदस्य करण्यात आले. यावेळी सर्वश्री मोहन कारेकर, अनंत लाड, प्रेमानंद गुरव, शिवकुमार हिरेमठ व अशोक हलगेकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी बोलताना श्री. जी. डी. देसाई म्हणाले की, मी जायंट्सबद्दल ऐकून होतो पण आपण ज्या आपुलकीने एकमेकांशी संबंध वृद्धिंगत केले आहेत ते पाहता जायंट्स हे कुटुंब आहे याची मला जाणीव झाली. एखादी संस्था किंवा उद्योग टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर तेथे शिस्त हवी, प्रामाणिकपणा हवा आणि योग्य कार्य करणाऱ्याला योग्य तो मानसन्मान द्यायला हवा. आम्ही आमच्या उद्योगांमध्ये कधीही मालक आणि कामगार असा भेदभाव करीत नाही. कामगारांच्यामुळेच आम्ही यशस्वी आहोत” अशी कृतज्ञतापूर्व भावना त्यांनी व्यक्त केली.
आभार प्रदर्शन अनंत लाड यांनी केले तर सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta