बेळगाव : शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्गावर बंदी घातली असली तरी उपनगरातून अवजड वाहनांची वाहतूक चालूच आहे. यामुळे अनेकवेळा उपनगरातील प्रमुख रस्त्यावर देखील वाहतुकीची कोंडी होत आहे.
सकाळच्या वेळेत अशाप्रकारची वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच वाहतूक कोंडी येळ्ळूर रोड वडगाव दरम्यान रोज होताना दिसत आहे.
वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय प्रशंसनीयअ सला तरी त्याचा फटका उपनगरातील नागरिकांना बसत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी हे वाहनचालक इच्छित स्थळी जाण्यासाठी उपनगरातील रस्त्यांचा वापर करीत आहेत. त्यामुळे उपनगरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
सकाळी येळ्ळूर रोड येथे मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकमुळे वाहतूक ठप्प झाली होती. येळ्ळूर रोडकडून अनगोळकडे जाणारा ट्रक रस्त्यावर आडवा असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सकाळच्या वेळेत कामावर जाणारे नागरिक, शाळेच्या रिक्षा, स्कूल बस आदींची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक देखील कामानिमित्त बाहेर ये-जा करीत असतात उपनगरातील अरुंद रस्त्यावर अवजड वाहने आली की वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तरी रहदारी पोलीसानी उपनगरात देखील सकाळच्या वेळेत अवजड वाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta