बेळगाव : बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या दुतर्फा असलेली जुनी झाडे तोडण्यास सार्वजनिक आक्षेप घेण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन सहाय्यक वन संरक्षणाधिकार्यांना सादर करण्यात आले आहे.
बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या दुतर्फा असलेली जुनी झाडे सोडण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र कर्नाटक वृक्ष जतन कायदा 1976 च्या नियम 8 (3) (7) अन्वये स्थानिक नागरिकांचा याला तीव्र विरोध आहे.
आज वयाच्या सत्तरीत असलेले नागरिक सांगतात की लहानपणापासून ते ही झाडे पहात आले आहेत. त्यामुळे संबंधित झाडे 70 वर्षांपेक्षा जुनी आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्वजण जाणतो की वड आणि पिंपळाची झाडे सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती करणारी झाडे आहेत. तेंव्हा अशा झाडांना आम्हाला मुकावयाचे नाही.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अनेक झाडं नामशेष करण्यात आली आहेत. यापद्धतीने कमी होत चाललेल्या झाडांच्या संख्येचा भावी पिढीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे बेळगावच्या हरित शहराच्या आलेखाला धक्का बसून तो घसरू शकतो. सध्या तो घसरलेलाच आहे, मात्र अधिक घसरू नये यासाठी नागरिकांचा संबंधित झाडे तोडण्यास तीव्र विरोध आहे. तेंव्हा ही योजना तात्काळ रद्द केली जावी, अशा आशयाचा तपशील सहाय्यक वनसंरक्षणाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी प्रसाद चोल्ली, वरूण कारखानीस, अभिनंदन पिराळे, राहुल पाटील, संतोष तोराळी, सय्यदअली नदाफ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta