माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हि शिक्षण संस्था व संस्थेचे पहिले हायस्कूल श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळुर यांच्या स्थापनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्था व हायस्कूलचा संयुक्तपणे सुवर्णमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय आज संस्था, हायस्कूल व माजी विद्यार्थी यांच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, श्री चांगळेश्वरी हायस्कूल व हायस्कूलचे प्रमुख माजी विद्यार्थी यांची प्राथमिक बैठक आज सकाळी दहा वाजता श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रसाद यल्लोजी मजुकर होते. बैठकीमध्ये सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक भव्य कार्यक्रम, स्मरणिका तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये विविध शारिरिक व बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा झाली. या सर्व उपक्रमांची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने एक व्यापक बैठक रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता येळ्ळुर तेथे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्याचे ठरले आहे. या बैठकीला श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक, हायस्कूलचे शिक्षक, निवृत्त शिक्षक, हायस्कूलचे आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना निमंत्रित करायचे ठरले.
बैठकीला प्रायमरी स्कूल व हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अरुण धामणेकर, श्री. आय. बी. राऊत सर्व शिक्षक, शिक्षिका व प्रमुख माजी विद्यार्थी उपस्थित होते.