दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने
बेळगाव : टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सकाळी “त्या” उड्डाणपलावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
आमदार माजी आमदार रमेश कुडची यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्या उड्डाण पुलाच्या ठिकाणी मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. पुलावरील रस्त्याला ज्या ठिकाणी खड्डा पडला होता, त्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. काँग्रेसच्या या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही लक्षणीय सहभाग होता.
यावेळी शहराचे माजी आमदार रमेश कुडची म्हणाले की, 12 तारखेला तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाचे उद्घाटन झाले आणि अवघ्या 48 तासातच रस्त्यावर खड्डा पडला यावरून निकृष्ट बांधकामाची प्रचिती येते.
यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो याचा तरी किमान विचार संबंधितांनी करावयास हवा तुम्ही भ्रष्टाचार करून निधी तर हडप करतच आहात. आता लोकांच्या जीवावरही उठला आहात का? असा सवाल करून या पुलाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी ही आमची एकच मागणी आहे. केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असा नारा दिला होता. हा त्यांचा नारा आता कुठे गेला? देशभरात झालेला भ्रष्टाचाराला कोण उत्तर देणार?
केंद्र सरकारला जर देशभरातील भ्रष्टाचाराबाबत उत्तर द्यावयाचे असेल तर त्यांनी त्याची सुरुवात सर्वप्रथम बेळगाव शहरापासून करून शहरवासीयांना न्याय द्यावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एससी-एसटी लोकांना न्याय द्यावा. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गोव्यात यापूर्वी दोन उड्डाण पुल कोसळल्यामुळे बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या कामाची चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार रमेश कुडची यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta