बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायत प्रत्येक विकास कामांमध्ये सक्रिय आहे. विकासकामांना प्राधान्य देणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच प्रयत्नशील असते आणि या सगळ्याचा आढावा घेऊन येळ्ळूर ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास पाहता बेळगाव जिल्ह्यातून येळ्ळूर ग्रामपंचायतीला मॉडेल ग्रामपंचायत करण्याचा सरकारचा मानस आहे.
यासंदर्भात शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली. मॉडेल ग्रामपंचायतीअंतर्गत दूरदृष्टी या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, आरोग्य अधिकारी तसेच आशा वर्कर्स यांनी येळ्ळूरमधील प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून त्या लेखी स्वरूपात लिहून घेतल्या. यामध्ये शैक्षणिक अडचणी असतील, रस्त्याचे काम, गटारीचे काम किंवा इतर काही पेन्शन वगैरे सारख्या समस्या असतील तर या सर्व समस्या जाणून घेऊन या समस्यांचे निवारण करण्यासाठी काल झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दूरदृष्टी योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षातील विकासकामांसाठी नेमके कोणते आणि कसे उपक्रम राबवले जातील याविषयी देखील चर्चा करण्यात आली.
तसेच येळ्ळूर ग्रामपंचायत समोर येळ्ळूर गावाच्या आराखड्याची प्रतिकृती काढून त्यामध्ये कुठे आणि कशा पद्धतीने रस्ते, गटारी, किंवा इतर विकास कामांना गती देता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये येळ्ळूर गावच्या चारी बाजूंनी रिंग रोड तयार करणे, गावातील सर्व जूने बोळ व्यवस्थित करून ओपन करणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, गावामध्ये स्मशान आणि सार्वजनिक ठिकाणी सोलार बसवणे, सार्वजनिक ठिकाणी आसन व्यवस्था निर्माण करणे, गावातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय बांधणे, गावामध्ये बस स्टॅन्ड निर्माण करणे, तसेच गावांमधील नवीन वस्ती वाढलेली असून त्या ठिकाणी पथदीप, रस्ते, गटार निर्माण करणे गावातील ग्रामपंचायतीच्या मालमत्तेला संरक्षण भिंत निर्माण करणे आणि गावातील मेन शिवाजी रोडला वॉकिंग ट्रॅक निर्माण करणे.. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका पंचायत अधिकारी बी. एच. बजंत्री यांनी दूरदृष्टी योजनेविषयी माहिती देत पुढील पाच वर्षात विकासाच्या दृष्टीने नेमकी कोणती पावले उचलली पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन केले. सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील म्हणाले, येळ्ळूर ग्रामपंचायतीने सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आणि नेहमीच विकास कामांना प्राधान्य दिले आहे. या दृष्टिकोनातून मॉडेल ग्रामपंचायत साठी येळ्ळूर ग्रामपंचायतची झालेली निवड ही अभिमानास्पद बाब आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, शिक्षक, आरोग्य अधिकारी आशावर्कर्स आणि गावातली नागरिकांचा मोलाचा सहभाग आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून विकास कामांना अधिकाधिक गती देणे गरजेचे असून या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी पुढेही सर्वांनी मिळून शैक्षणिक आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात अगदी बारकाईने लक्ष घालून असेच एकजुटीने कार्यरत राहून पार पाडायची आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्या, पीडीओ अरुण नाईक सभासद, अधिकारी वर्ग, गावातील शाळेचे शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta