Saturday , October 19 2024
Breaking News

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

Spread the love

 

बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा समितीनिष्ठ” अश्या भ्रमात राहणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने केलेली “बाष्कळ बडबड” ऐकून बेळगावची समितीप्रेमी जनता संभ्रमात पडली आहे “हे व्यासपीठ काळ्या दिनाची निषेध सभा होती की कोणाचा अहंकार कुरवळण्यासाठी घेतलेली सभा?”
युवा समितीच्या अध्यक्षाने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता अक्षरशः जबरदस्तीने माईक हातात काढून घेऊन जी काही मुक्ताफळे उधळली की “मी राष्ट्रीय पक्षाच्या संपर्कात आहे आणि माझे राष्ट्रीय पक्षाशी आर्थिक साटेलोटे आहे असा माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर तसे पुरावे सादर करावेत” काळ्या दिनाच्या सभेला एकप्रकारे हा गालबोट लावण्याचा प्रयत्न होता. शुभम शेळके आणि युवा समितीने हे समजून घेणे आवश्यक होते की युवा समिती कोणत्या प्रकारे “आर्थिक व्यवहार” करते किंवा त्यांचे व्यवहार “पारदर्शी” आहेत की नाही याच्याशी त्या सभेतील समितीप्रेमी जनतेचा संबंध आहे काय? आणि हा वाद उकरून काढण्याची ही वेळ आहे का? युवा समिती कोणत्या मार्गाने पैसे जमा करते याच्याशी काळ्या दिनाच्या सभेचा काहीही संबंध नसताना शुभम शेळके यांनी केलेल्या विधानामुळे तसेच या सभेचे गांभीर्य घालविल्यामुळे उपस्थित समितीप्रेमीत नाराजी पसरली आहे.
शुभम शेळके यांचा लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला होता. आजपर्यंतच्या इतिहासात प्रत्येक निवडणुकीत लोकवर्गणीतून हा खर्च केलेला आहे. समाजातील मराठी प्रेमी, समितीनिष्ठ दानशूर व्यक्तींनी केलेल्या आर्थिक मदतीतूनच आजपर्यंत समितीने निवडणुका लढविल्या आहेत. मात्र शुभम शेळके यांनी विधान केले की समितीला मदत केली तर काय त्यांनी समिती विकत घेतली का?सर्वप्रथम शुभम शेळके यांनी समजून घेतले पाहिजे की समिती ही काही विकण्याची आणि विकत घेण्याची वस्तू नाही. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे संघर्षाचा पेटता निखारा आहे. समिती ही अनेकांच्या त्यागावर व बलिदानावर उभी आहे. त्यामुळे समितीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांचा शुभम शेळके यांनी एकप्रकारे अपमान केला आहे. समितीचा परीघ वाढत असताना इतर संघटना व पक्षातून मराठी भाषिक समितीत सामील होत असताना शुभम शेळके सारख्या झारीतील शुक्राचार्याने आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बाहेरून लोक निषेध फेरीत आले आहेत असे वक्तव्य करणे म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे. समिती मराठी माणसाची आहे. कोणताही मराठी माणूस त्यात येऊ शकतो. त्यासाठी शुभम शेळके सारख्या व्यक्तीची परवानगी घेण्याची गरज नाही. प्रत्येक मराठी माणसाला समिती जोडू पाहत असताना, समितीत बाहेरून लोक येऊन समितीचे बळ वाढत असताना या प्रक्रियेलाच खिळ घालणाऱ्या शुभम शेळके यांच्या उद्देशावरच शंका येत आहे. ते कुणाचे हस्तक म्हणून तर काम करत नाही ना? अशी शंका उपस्थितात व्यक्त होत होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुभम शेळके सारख्या वृत्तीवर चाप लावण्याची गरज आहे, अशी समितीप्रेमीतून मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *