बेळगाव : जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगावच्या महापौर-उपमहापौरांची निवडणूक होईल, बेळगाव मनपाच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा झेंडा मनपावर फडकेल, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिली.
बेळगाव महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांची आ. अभय पाटील यांनी आज शुक्रवारी बैठक घेतली. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. परंतु ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर अडचणीमुळे महापौर-उपमहापौरांची निवड होऊ शकली नव्हती. हुबळी-धारवाड मनपाच्या महापौर-उपमहापौरांची निवड होऊन २ महिने झाले. पण बेळगाव महापौर-उपमहापौरांची निवड अद्याप झालेली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. कायदेशीर अडचण दूर झाल्याचे आता अधिकाऱ्यांनीही सांगितले आहे. ऍडव्होकेट जनरल यांचे मत विहारात घेऊन सरकार व निवडणूक अयोग्य निवडणुकीचा कार्यक्रम येत्या तीन-चार दिवसांत जाहीर करेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ६ किंवा ९ जानेवारीला निवडणूक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर-उपमहापौरांची निवड अद्याप न झाल्याने भाजप नगरसेवक निराश झाल्याचा दावा आ. अभय पाटील यांनी फेटाळून लावला. ते जर निराश झाले असते तर घरी बसून राहिले असते, पण ते वार्डात फिरताहेत, जनतेत मिसळताहेत, जनतेच्या समस्या सोडवत आहेत. निराश कोण झाले असेल तर आमचे विरोधक झाले असावेत असा टोला त्यांनी हाणला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर अधिक भाष्य करणे टाळत आ. अभय पाटील म्हणाले, हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सरकार आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. मीसुद्धा मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येईल तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे. कोणी कायदा हातात घेऊ नये. बेळगावची जनता हुशार झाली आहे. बेळगावचा विकास झालेला जनतेला हवा आहे असा दावा आ. अभय पाटील यांनी केला.
यावेळी बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके आणि भाजप नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta