बेळगाव : मैत्रिणींनो पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तक वाचनाने प्रेरणा मिळते. जीवन समृध्द होते. मनात चैतन्य निर्माण होते. जीवनात जय पराजय, अशा निराशा चांगले वाईट गोष्टी घडत असतात तेंव्हा आपली सद्सद विवेकबुध्दी जागृत होते आणि आपण योग्य निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो असे वाचनाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे महिलांनी वाचन केले पाहिजे आणि आपल्या भावी पिढीलाही वाचन संस्कार दिले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका आशाताई रतनजी यांनी तारांगणतर्फे आयोजित महिलांच्या वाचन विश्व या व्याख्यानातून महिलांना केले. संक्रांतीचे हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्वसामान्य महिलांनी वाचन चळवळीत सहभागी व्हावे म्हणून व्याख्यानाचे आयोजन केले होते. पाटील गल्ली येथील सिध्दनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर संजना शिगीहळी, अरुणा गोजे पाटील होत्या. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
तारांगणच्या केंद्रसंचालिका नेत्रा मेणसे यांच्या हस्ते आशाताईंचा व सुधा माणगावकर यांच्या हस्ते संजना यांचा शाल, बुके व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. संजना शिगीहळी यांनी तारांगणतर्फे महिलांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात त्यामुळे महिलांच्या कला गुणांना वाव मिळतो. नवनवीन मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. महिलांच्या विकासासाठी तारांगण एक चांगले व्यासपीठ आहे. असे तारांगणच्या कार्याचे कौतुक केले. आशाताई रतनजी यांनी वाचानाचे महत्व चांगल्या पद्धतीने समजून सांगितले त्याचा उपयोग महिलांना भावी जीवनात होईल असे त्या म्हणाल्या. काही प्रतिष्ठित मान्यवर महिलांचाही सन्मान करण्यात आला. प्रारंभी नामदेव देवकी भजनी मंडळाने भजन व राधा मुरगोड यांनी स्वागतगीत गायिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अस्मिता आळतेकर यांनी केले. आभार अरुणा गोजे-पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta