बेळगाव : वडगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यरमाळ रोड परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीचा चावा घेतला आहे. मागील आठवड्यात वडगाव स्मशानभूमीजवळ कुसाणे नामक व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला व त्यांचे जवळजवळ लचके तोडले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी
ठरली आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकन मोहीम देखिल अर्धवट पडली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
यरमाळ रोड परिसरात कचऱ्याची उचल देखील व्यवस्थित होत नाही त्यामुळे रस्त्याशेजारी अन्नाच्या शोधार्थ भटकी कुत्री तेथे जमा होतात. याचा त्रास पहाटे किंवा रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे बरीच मुले धावण्याचा सराव देखील करतात. त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta