पहिल्या बाल नाट्यसंमेलनाची यशस्वी सांगता
बेळगाव : संगीत नाटकांची सुरुवात बेळगावातून झाली. बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागात संगीत नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळाली. बेळगावच्या मातीतच संगीत नाटकाचे बीज रोवले गेले. त्याचप्रमाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी बालरंगभूमी अभियानाच्या पहिल्या बाल नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभा प्रसंगी बोलताना केले.
येथील संत मीरा हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय बालनाट्य संमेलनाची आज यशस्वी सांगता झाली. सांगता समारंभाला अभिनेते सुबोध भावे यांच्यासह संमेलनाच्या अध्यक्षा मीनाताई नाईक, अभिनेते प्रसाद पंडित, उद्घाटक आणि अभिनेत्री सई लोकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या डॉक्टर संध्या देशपांडे, बालरंगभूमी अभियानाच्या विना लोकुर, देवदत्त पाठक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या मनोगत पुढे बोलताना सुबोध भावे म्हणाले, बालनाट्यांच्या नावावर कंटाळवाणा प्रकार पाहायला मिळत आहे. लेखक पैशांसाठी बालनाट्यांकडे पाठ फिरवून सिरीयल कडे वळले आहेत. आपल्याकडे मुलांच्या करमणुकीचे चित्रपट बनविले जात नाहीत. मुलांना आनंद देण्याऐवजी उपदेशाचे डोस पाजले जातात. पालक आपल्या मुलांकडे घोड्यांच्या शर्यतीच्या नजरेने पाहत आहेत. अशावेळी मुलांना आनंदापासून वंचित ठेवण्याचे पाप घडू नये. यासाठी चांगल्या बालनाट्यांची निर्मिती सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी लेखकांचे वर्कशॉप वर काम होणे आवश्यक आहे. ईसापनीती आणि छोटा मुलांच्या गोष्टीतून चांगल्या बालनाट्यांची निर्मिती होऊ शकते.
रंगभूमी ही मंदिरा इतकीच पवित्र आहे. रंगभूमीवर कलेच्या देवाची पूजा केली जाते. नाटकाचा जात धर्म पंथ एकच असतो. नाटक हे समुदायाने होते. नाटकातून एकमेकांशी सुसंवाद आणि विचारांचे आदान प्रदान होते. नाटकातून समुदायाला सोबत घेऊन जाण्याचे ज्ञान प्राप्त होते. शाळांमधून ज्याप्रमाणे शारीरिक शिक्षणाचे तास असतात, त्याच धर्तीवर बालनाट्याचे तास आवश्यक आहे.या संमेलनातून बाल नाट्य चळवळीला सुरुवात झाली आहे, असेही विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला. अभिनेते प्रसाद पंडित यांनीही समायोजित विचार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta